डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन
भोकर ( प्रतिनिधी ) शहरातील मध्यवर्ती चौकात असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण त्वरीत हटवून येथे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील माजी नगरसेविका वनमाला पुंडलिकराव क्षिरसागर यांच्यासह शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यानी पालकमंत्री अशोक चव्हाणांना निवेदनाव्दारे केली आहे .
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याची जागा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असून सदरील ठिकाणी बौद्ध बांधवांच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येथे मोठा समाज बांधव जमतात .परंतू येथील अनेक व्यापाऱ्यांनी सदरील जागेवर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण केल्याने ते हटविण्यासाठी येथील सामाजिक राजकिय पुढाऱ्यांनी प्रशासनाकडे कित्येक निवेदने देऊन वेळोवेळी विनंती केली परंतू अद्यापही नगर परिषद प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने येथील आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे प्रस्तूत निवेदनात म्हटले आहे जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी दि.१६ जूलै रोजी भोकर शहरात आले होते .येथील शासकिय विश्रामगृहात त्यांची भेट घेवून निवेदने दिली . सदरील निवेदनावर येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम कसबे , माजी नगरसेविका यांचे प्रतिनिधी विक्रम क्षिरसागर, युवा कार्यकर्ते आनंद ढोले, मधुकर गोवंदे, जयभीम पाटील ,आर के कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .