मराठवाडा केसर आंबा ' प्रसिध्दीसाठी डाक विभागातर्फे विशेष आवरनाचे अनावरण
आपली न्युज
दि. 26, (वार्ताहर) :- मराठवाडा विभाग हा ' केसर ' जातीच्या विशिष्ट आंब्याच्या लागवडीसाठी प्रसिध्द असून हा आंबा देश-विदेशात त्याच्या चव आणि रंगामुळे प्रसिध्द असून मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातो. या आंब्याच्या जातीला त्याच्या विशिष्टतेसाठी ' मराठवाडा केसर आंबा ' असा भौगोलिक संकेत (जीओ टॅग) भारत सरकारद्वारा मँगो ग्रोव्हर्स असोसिएशन औरंगाबाद यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ही बाब मराठवाड्यासाठी भूषणावह आहे. याचे औचित्य साधून भारतीय डाक विभागाने मराठवाडा केसर आंब्याला प्रसिध्दी मिळावी तसेच टपाल तिकीट संग्रह छंद जोपासणाऱ्या व्यक्तींसाठी व नागरिकांसाठी या विषयावरील विशेष आवरनाचे आज 27 ऑगस्ट, 2021 रोजी अनावरण करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम औरंगाबाद परिक्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल व्ही.एस.जयासंकर यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्राचे एम.बी.पाटील, मराठवाडा आंबा उत्पादक संघाचे उपाध्यक्ष विजय आण्णा बोराडे आदी मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमानंतर मुख्य डाकघर औरंगाबाद येथे विशेष डाक मोहोरद्वारे रद्दीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. या निमित्त प्रवर अधीक्षक डाक घर औरंगाबादचे जी.हरिप्रसाद यांनी सर्व नागरिकांना व टपाल तिकीट संग्रह जोपसणाऱ्या सर्वांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.